Sridhar Vembu : जागतिक स्तरावरील बलाढ्य तंत्रज्ञान कंपन्यांची आर्थिक आणि धोरणात्मक शक्ती आज अनेक सार्वभौम देशांपेक्षाही मोठी झाली आहे. या कंपन्यांच्या वाढत्या प्रभावावर 'जोहो'चे सह-संस्थापक श्रीधर वेंबू यांनी पुन्हा एकदा कडक शब्दांत टीका केली आहे. "या कंपन्यांकडे पाहण्याचा आणि त्यांना समजून घेण्याचा योग्य मार्ग म्हणजे 'ईस्ट इंडिया कंपनी'," अशा शब्दांत वेंबू यांनी टेक कंपन्यांच्या मक्तेदारीवर निशाणा साधला आहे. १४ फेब्रुवारी रोजी 'X' (ट्विटर) वर त्यांनी आपली ही भूमिका मांडली.
'अल्फाबेट'च्या एका निर्णयाने वेधले लक्ष
वेंबू यांनी ईस्ट इंडिया कंपनीचा संदर्भ अशा वेळी दिला, जेव्हा गुगलची मूळ कंपनी 'अल्फाबेट'च्या आर्थिक क्षमतेची चर्चा रंगली आहे. अल्फाबेटने अवघ्या २४ तासांत ३,२०० कोटी डॉलर्सचे कर्ज उभारले आहे. एवढी मोठी रक्कम उभारण्यासाठी कोणत्याही देशाला बराच वेळ लागतो. अल्फाबेटने १०० वर्षांच्या कालावधीसाठी बाँड्स जारी केले आहेत. याउलट, भारतासारख्या देशाचे सोव्हरेन बाँड्स सामान्यतः ४० वर्षांपर्यंत असतात. हे उदाहरण सिद्ध करते की, या कंपन्यांकडे कोणत्याही सरकारपेक्षा जलद गतीने आणि मोठ्या प्रमाणावर भांडवल उभे करण्याची ताकद आहे.
'डिजिटल सार्वभौमत्व' का महत्त्वाचे?
श्रीधर वेंबू यांनी यापूर्वीही टेक कंपन्यांच्या केंद्रीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गेल्या महिन्यात फ्रान्सने 'झूम' आणि 'मायक्रोसॉफ्ट टीम्स' यांसारख्या अमेरिकन प्लॅटफॉर्मचा वापर थांबवून स्वदेशी 'विजियो' प्लॅटफॉर्म वापरण्याचा निर्णय घेतला. युरोपला आता डिजिटल सत्तेच्या केंद्रीकरणाची जाणीव होत आहे, असे वेंबू यांनी म्हटले. त्यांनी प्रत्येक देशाने स्वतःचे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर स्वतःच नियंत्रित करावे, म्हणजेच 'टेक्नॉलॉजी सार्वभौमत्वा'कडे वळावे, असा आग्रह धरला आहे.
वाचा - व्हाईट गोल्ड की रोज गोल्ड? तुमच्या खिशाला आणि फॅशनला काय परवडेल? कोणतं आहे ट्रेंडींग?
भू-राजकीय समीकरणे बदलण्याची भीती
ईस्ट इंडिया कंपनीने ज्याप्रमाणे केवळ व्यापाराच्या नावाखाली येऊन भारताची राजकीय आणि आर्थिक सूत्रे हाती घेतली होती, तशीच भीती वेंबू यांनी व्यक्त केली आहे. आजच्या टेक कंपन्या केवळ बाजारपेठेवरच नाही, तर त्यांच्या प्रचंड आर्थिक शक्तीमुळे जगातील भू-राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता ठेवतात.
